'आ बैल....
Saturday, March 4, 2023
‘आ बैल....

पुणे शहरात अलीकडील काळात काही समस्यांवर कुणालाच उपाय सापडत नाही, अशी स्थिती निर्माण झालेली दिसते. यासाठी लाख प्रयत्न केले जातात. मात्र, त्यातील अंमलबजावणीत सातत्य मात्र दिसून येत नाही. साधारणत: या समस्या केवळ पुण्यात आहेत असेही काही नाही, त्या तशा जवळपास सर्व शहरांत कमीअधिक प्रमाणात आहेतच. परंतु, पुणेकरांबाबत सर्वदूर जो गोड समज आहे, तो मात्र पुण्यात येणार्या प्रत्येकाचा भ्रमनिरास करतो. होय, वाहतूककोंडी आणि कचर्याच्या समस्येने पुणेकरांच्या सध्या नाकीनऊ आणले आहेत आणि येथे बाहेरून येणारा प्रत्येक जण जेव्हा ही समस्या प्रत्यक्ष पाहतो, तेव्हा त्यालाही या समस्यांची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
मनपा प्रशासन आणि वाहतूक नियंत्रण विभाग या समस्यांवर कितीतरी स्पर्धा, योजना, लोकसहभाग घडवून आखणी करीत असते. मात्र, पुण्याचा झपाट्याने वाढणारा विस्तार आणि लोकांच्या गर्दीने प्रशासनाची पुरती दमछाक होताना दिसते. कोणतेही योग्य नियोजन नसले की, अशा समस्या तेथे कायमच्या मुक्कामी असतात. कचर्याचे ढीग बघून आता तोंडाला मास्क बंधनकारक करण्याची सवय आपसुकच होत आहे. कचर्यासंबंधी काम करणार्या कर्मचार्यांची तर खरोखर कमाल आहे. दिवसेंदिवस सडून, कुजून दुर्गंधीयुक्त कचरा उचलण्याची पाळी त्यांच्यावर दिवसागणिक येते. कारण, त्यांनी हडपसर परिसर स्वच्छ केला की, आंबेगाव-कात्रज परिसरातून कचर्याच्या दुर्गंधीच्या तक्रारींचा ओघ येऊन पडतो. येथे प्रशासन कदाचित त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसेल म्हणून कमी पडत असेल. मात्र, ज्या परिसरात लोक राहतात ते असा कचरा टाकून देण्याबाबत जी दिरंगाई करतात, जी खरी संतापदायी बाब आहे. त्यांनी कचर्याची योग्य विल्हेवाट लावली, तर हे ढीग दिसणार नाहीत. मात्र, येथील नागरिक प्रत्येक खुल्या जागेत, रस्त्याच्या लगत कचरा टाकून आपल्या बेशिस्तीचा परिचय देतात, हे खरे दुखणे. त्यामुळे पुणे विद्रूप होण्यास सुरुवात झाली आहे. हीच बेशिस्त वाहतुकीतही दिसून येते. शहरातील एक भाग असा नाही की, जिथे वाहतूककोंडी होत नाही. पण, वाहतूक विभागातील पोलीसदेखील चौकाचौकांत मोबाईलवर मिम्स बघण्यातच व्यस्त असतील, तर या सर्व समस्या आपणच ओढवून घेतल्या. म्हणून आ बैल...
... मुझे मार!’
रखडलेली कामे पूर्ण करायची नाहीत, असा चंगच जणू प्रशासकीय यंत्रणेने पुण्यात बांधला आहे, असे सध्याचे चित्र. मेट्रोची कामे अर्धवट आहेत, अनेक कंपन्या आणि ठेकेदारांनी विविध कारणांसाठी रस्ते, पदपथ खोदून ठेवले आहेत. हे सगळे कमी की काय म्हणून अतिक्रमण धारकांनी तर फुटपाथ म्हणजे आमच्या मालकीचे स्थान असल्याच्या आविर्भावात येथे व्यवसाय सुरू केले आहेत. पुण्यातील एकही मोठा रस्ता सुटसुटीत आणि प्रशस्त आढळून येत नाही. पुण्याबाहेर जेव्हा कोथरूडची ख्याती गायली जायची, तेव्हा हा भाग पुण्यातील आदर्श वसाहतीचा परिसर म्हणून अन्य शहरांत, महानगरांत कित्ता गिरवला जात असे. आता मात्र या भागात पाय ठेवणे, वाहनेदेखील नेणे जिकरीचे झाले आहे. अतिक्रमणे शहराला कोंडीत धरीत आहेत आणि वाहतूककोंडी नागरिकांवर अतिक्रमण करू लागली आहे. वाहनांचे पार्किंगदेखील कळीचा मुद्दा ठरू लागला. भविष्यात रस्त्यावर ही वाहनाची गर्दी काय काय उपद्व्याप करेल, ही कल्पनाच न केलेली बरी. शहरात दररोज वाहन खरेदी करणार्यांची संख्या वाढत आहे. एका घरात जेमतेम पाच सदस्य गृहीत धरले तरी प्रत्येक सदस्याकडे स्वतंत्र वाहन असल्याने तो वाहन घेऊनच बाहेर पडतो. आता वेळ इतकी भयंकर आली की, वाहने घराच्या परिसरात ठेवतो म्हटले तरी तो भाग विद्रूप वाटू लागला आहे.
आधी कुटुंबात संख्या वाढवू नका, असे सांगितले जायचे. आता कुटुंब नियोजनाच्या धर्तीवर वाहन नियोजन किंवा सक्तीची वेळ आली आहे. बाजरपेठा ग्राहकांपेक्षा वाहनांच्या गर्दीने गजबजू लागल्या आहेत. हे सगळं अनियंत्रित होऊ लागल्याने विकास, प्रगतीपेक्षा ही बेशिस्तच शहराच्या सौंदर्यीकरणाला धब्बा आहे.
त्यामुळे विकास, प्रगतीचे एकीकडे प्रयत्न होत असताना हे शहरातील वास्तव याच प्रगतीसाठी अडथळा ठरत असेल, तर नक्कीच याबाबतचे नियोजन धोरण अचूकरित्या अमलात आणण्यासाठी गांभीर्याने कृती करण्याची वेळ आली आहे. कारण, हे सर्व आपणच ओढवून घेतले आणि मग हेच म्हणणे भाग पडते!
-
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा