हिमनद्यांच्या विघटनाचा धोका!


हिमनद्यांच्या विघटनाचा धोका

    
himnadya

जागतिक तापमानवाढीचे परिणाम बहुआयामी आहेत. त्यातील एक म्हणजे पृथ्वीच्या ध्रुवांवरील बर्फ वितळणे. पृथ्वी ही विविध समशीतोष्ण भागात विभागली गेली आहे. परंतु, या सर्व भागांची स्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. वितळत्या हिमनद्या, मंदावत चाललेला महासागरातील प्रवाह आणि वाढणारी समुद्राची पातळी याचा मानवी जीवनावर काय परिणाम होऊ शकतो, याचा ऊहापोह करणारा हा लेख...


दरीतून हळूहळू सरकणारा हिमखंड म्हणजे हिमनदी. यालाच हिमानी, हिमवाहदेखील म्हटले जाते. बर्फाचा थर हा, पृथ्वी आणि महासागरांचे संरक्षणात्मक आवरण आहे. बर्फ अतिरिक्त उष्णता अंतराळात परावर्तित करण्यास सक्षम आहे आणि या प्रक्रियेने पृथ्वी थंड ठेवण्याचे मौल्यवान काम करतो. आपल्याला माहीत आहे की, आर्क्टिक प्रदेश किंवा अंटार्क्टिका चा प्रदेश व तसेच हिमालयाचे हिमच्छादित सुळके, विषुववृत्तापेक्षा थंड राहतात. याचे मुख्य कारण अभ्यासातून असे समोर येते की, इथे सूर्याची बहुतेक उष्णता बर्फामुळे परत अंतराळात परावर्तित केली जाते.





 जगभरातील हिमनद्या अनेक हजार वर्षे जुन्या बर्फासह अस्तित्त्वात आहेत आणि कालांतराने हवामान कसे बदलत गेले, हे या नद्यांच्या अभ्यासावरून कळू शकते. हिमनगांचा अभ्यास करून, पृथ्वीवर किती वेगाने तापमानवाढ होत आहे, याबद्दलची मौल्यवान माहिती आपण मिळवत आहोत. आज, पृथ्वीवरील सुमारे दहा टक्के भूभाग हिमनद्यांनी झाकलेला आहे. यातील जवळजवळ 90 टक्के अंटार्क्टिकेत आहे. उर्वरित दहा टक्के ग्रीनलँड व आर्क्टिक प्रदेशतला बर्फ आहे.अंटार्क्टिक आणि ग्रीनलँडमध्ये सतत हिमनग वितळल्याने सागरी प्रवाहांवर प्रभाव पडतो आहे. कारण, महासागराच्या उष्ण पाण्यात प्रवेश करणार्‍या हिमनगापासून येणार्‍या थंड पाण्यामुळे, सागरी प्रवाहाचा वेग कमी होत आहे आणि जमिनीवरील बर्फ वितळल्याने समुद्राची पातळी वाढत आहे. आज आपण जाणून घेऊया, या भीषण त्रिकूटाचे गणित कसे चालते ते.




himnadya


महासागरातला प्रवाह हा गरम पाण्याचा, विषुववृत्तावरून ध्रुवीय प्रदेशाच्या थंड पाण्याकडे जाण्याचा मार्ग आहे. या दोन्ही पाण्यांच्या तापमानातला बदल जितका तीव्र, तितका प्रवाहाचा जोर चांगला. हे विषुवृत्तावरील उष्ण पाणी, हवामानातील उष्णतादेखील ध्रुवीय प्रदेशाकडे नेते व संपूर्ण पृथ्वीचे तापमान कमी होते. हा घटनाक्रम युगानुयुगे चालत आला आहे. पण नजीकच्या काळात, ‘ग्रीन हाऊस’ गॅसेस, ‘ग्लोबल वॉर्मिंग’ व याने होणार्‍या वातावरणतील प्रदूषणाने, ध्रुवीय प्रदेशातील ओझोनचा थर खूप विरल झाला आहे.





ज्याने या प्रदेशात तापमानवाढ होऊन बर्फ वितळू लागला आहे. या तापमानवाढीनंतर, आधी नमूद केलेल्या विषुववृत्त या पाण्यात आणि ध्रुवीय पाण्यातल्या तापमानातला बदल कमी होऊ लागला आहे. याने महासागरातला प्रवाह मंदावू लागला आहे आणि याचे परिणामस्वरूप म्हणजे, पृथ्वीचे सामान्य तापमान वाढू लागले आहे. तुम्हाला जाणवले असेल की, ही प्रक्रिया एखाद्या ‘ब्रेक’ नसलेल्या मालगाडी सारखी आहे व म्हणून याचे वाईट परिणाम वाढत जातील जर आपण वेळीच हस्तक्षेप केला नाही तर...




asval
छोट्याशा समुद्रिय बर्फाच्या तुकड्यावर अडकलेले ध्रुवीय अस्वल


भविष्यात, ही ग्रीनलँड आणि अंटार्क्टिक बर्फाची चादर कितीप्रमाणात आणि किती लवकर वितळते, यावर महासागराची पातळी किती वाढेल हे मुख्यत्वे ठरेल. ‘ग्रीन हाऊस’ गॅसेसचे उत्सर्जन वाढत राहिल्यास, ग्रीनलँड बर्फाच्या थराचा वितळण्याचा सध्याचा दर शतकाच्या अखेरीस दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. चिंतेची बाब म्हणजे, जर ग्रीनलँडवरील संपूर्ण बर्फाचा थर वितळला, तर त्याने जागतिक समुद्र पातळी तब्बल 20 फुटांनी वाढेल.




आता तुम्हाला हादेखील प्रश्न पडला असेल की, बर्फ हा पाण्याचाच भाग, मग तो वितळण्याने समुद्राच्या पातळीत वाढ कशी? तर त्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, समुद्रावर असलेला बर्फ, याला बर्‍याचदा ‘सी आईस’ किंवा ‘आईसबर्ग’देखील म्हणतात, हा समुद्राच्या पृष्ठभागावर निर्माण होणारा बर्फ असून, हिमनद्या या जमिनीवर तयार होतात. ‘आईसबर्ग्स’ हे हिमनदीतील बर्फाचे तुकडे आहेत, जे हिमनद्यापासून तुटतात आणि समुद्रात वाहू लागतात. याचाच अर्थ, हिमानद्या आणि डोंगरांच्या कळसांवर अडकलेला बर्फ, हा समुद्राचा भाग नाही आणि म्हणून तो वितळल्यावर त्याच्या पातळीमध्ये वाढही होणारच. जेव्हा हिमनद्या वितळतात, तेव्हा या वितळलेल्या जलप्रवाहामुळे महासागरातील पाण्याचे प्रमाण लक्षणीय वाढते आणि म्हणूनच जागतिक समुद्र पातळी वाढण्यास हातभार लागतो.





समुद्रीय बर्फाची तुलना बर्‍याचदा एका ग्लासमधल्या पाण्यातील बर्फाच्या तुकड्यांशी केली जाते. जेव्हा तो तुकडा वितळतो तेव्हा ग्लासमधील पाण्याची पातळी फार बदलत नाही.यामुळे समुद्रीय बर्फाने पातळी बदलणार नाही, असे गृहीत धरले जाते. परंतु, आर्क्टिक समुद्रातील बर्फ कमी झाल्याने इतर अनेक विध्वंसक परिणामांना चालना मिळाली आहे, हे आपण शास्त्रीय विश्लेषणांनंतर जाणतो. यात, ’वालरस’ किवा ध्रुवीय अस्वलांची निवसस्थाने कमी होण्यापासून ते थेट जेट प्रवाह बदलून जागतिक हवामानामध्ये धोकादायक बदल होण्यापर्यंत परिणाम दिसतात.





1900 च्या दशकाच्या सुरुवातीपासून जगभरातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत. मानवी क्रियाकलाप या घटनेच्या मुळाशी आहेत. विशेषतः, औद्योगिक क्रांतीपासून, कार्बन डायॉक्साईड आणि इतर ’ग्रीन हाऊस’ गॅसेस च्या उत्सर्जनामुळे तापमान वाढले आहे. येत्या काही दशकांत आपण उत्सर्जनावर लक्षणीय अंकुश ठेवला, तरी 2100 च्या आधी जगातील एक तृतीयांशपेक्षा जास्त उर्वरित हिमनद्या वितळतील. जेव्हा समुद्राच्या बर्फाचा विचार केला, तर आर्क्टिकमधील सर्वात जुना आणि जाड बर्फाचा थर आधीच बर्‍यापैकी वितळला आहे. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, उत्सर्जन अनियंत्रितपणे वाढत राहिल्यास, 2040 च्या उन्हाळ्यात आर्क्टिक बर्फमुक्त होऊ शकेल आणि असे घडणे मानव संस्कृतीसाठी भयाण असेल.





ग्लेशियर आणि समुद्रातील बर्फाच्या वितळण्याचे, मानव आणि वन्यजीवांवर बहुस्तरीय वाईट परिणाम होणार आहेत. याघटनांचे परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत. जसजसे समुद्रातील बर्फ आणि हिमनद्या वितळतील आणि महासागर गरम होत जाईल, तसतसे सागरी प्रवाह जगभरातील हवामान पद्धतींमध्ये व्यत्यय आणत राहतील. मत्स्यव्यवसायावर उदरनिर्वाह असणारे उद्योग प्रभावित होतील. कारण, मासे पाण्याच्या उष्णतेने आपला समुद्रातील आवास बदलतील. पूर अधिक वारंवार होत असल्याने आणि वादळे अधिक तीव्र झाल्यामुळे किनारपट्टीवरील समुदायांना अब्जावधी डॉलर्सच्या नुकसानाचा सामना करावा लागेल. फक्त मानव नाही, तर पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला या विपदेचा सामना करावा लागेल. कित्येक जीव आपण कायमचे हरवून बसू.





या घटनांचा क्रम खरंच खूप भयानक आहे आणि या घटना आता घडत राहतील, हे वास्तव कोणीही बदलू शकत नाही, हे खरं आहे. भविष्यात येणार्‍या आपत्तींची जणू पूर्व तयारी आपण पाहत आहोत. आपण केवळ या घटनांना विलंबित करू शकतो आणि मानववंशीय हस्तक्षेपांद्वारे होणारे नुकसान थांबवण्याचे मार्ग शोधू शकतो. जणू मानवतेची वेळ संपत आली आहे असे वाटत असले, तरीही आपण सर्वांनी एकत्र काम केल्यास हा खेळ आपल्या बाजूने बदलू शकतो आणि आपण आपल्यासह पृथ्वीवरील लाखो जीव वाचवू शकतो. खालील काही फोटो तुम्हाला दाखवतील की, ध्रुवीय परिसरात ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा किती भयंकर परिमाण होतो आहे.





-डॉ. मयूरेश जोशी ✍️



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Telegram वर आम्हाला फॉलो करा,

Popular posts from this blog

शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर!

'आ बैल....