स्मरणशक्ती आणि परीक्षा!

Tuesday, February 7, 2023

स्मरणशक्ती आणि परीक्षा

    06-Feb-2023 
want-to-help-your-child-perform-well-in-exams--try-these-brain-foods-to-improve-memory


परीक्षेच्या काळात बर्‍याच विद्यार्थ्यांची तक्रार असते की, आपण वाचलेले लगेच विसरून जातो. आपल्या स्मरणशक्तीत काही दोष तर निर्माण नाही झाला, अशी चिंता त्यांना वाटत असते. बरेच पालक डॉक्टरांकडे स्मरणशक्ती वाढविणार्‍या टॉनिकबद्दल विचारणा करतात. बाजारात पण अशा अनेक प्रकारच्या टॉनिक्स उपलब्ध आहेत. ही औषधे घेणे चांगले की वाईट, याबद्दल पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते. वरील सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रथम स्मरणशक्तीबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊया व त्याचा उपयोग अभ्यासासाठी कसा करून घेता येईल, ते पाहूया.

एखाद्या संवेदनेची, गोष्टीची किंवा कल्पनेची साठवणूक करणे व जरुर पडल्यास ती संवेदना, गोष्ट किंवा कल्पना पुन्हा उद्धृत करणे यास ‘स्मरणशक्ती’ म्हणतात. या सर्व गोष्टींमध्ये मेंदूचा सहभाग महत्त्वाचा आहे. माणसाचा मेंदू हा सर्व प्राण्यांमध्ये तल्लख समजला जातो.

स्मरण शक्तीचे तीन मुख्य भाग आहेत.

१) संवेदनांची जाणीव होणे.

२) त्यांची साठवणूक होणे.

३) जरूर पडल्यास पुन्हा उद्धृत करणे.

संवेदनांची जाणीव मुख्यत्वे करून पाच ज्ञानेंद्रियांकडून होते. नाक, कान, डोळे, जीभ व त्वचा ही ती पाच ज्ञानेंद्रिये होत. याशिवाय मन किंवा चित्ताचा देखील संवेदनांच्या जाणिवेमध्ये महत्त्वाचा सहभाग असतो. सध्या आपण आपले लक्ष फक्त स्मरणशक्तीवर केंद्रित करूया. स्मरणशक्तीचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत.

१) र्‍हस्व स्मरणशक्ती : कानांनी ऐकलेल्या गोष्टींचे किंवा डोळ्यांनी पाहिलेल्या प्रसंगांचे लगेच काही वेळाने पुनरुच्चार करणे, हे या प्रकारात मोडते. परीक्षेच्या वेळेस मुलांना भीती वाटते, ही या प्रकारची स्मरणशक्तीची. आपण आता वाचलेले आपल्याला आठवत नाही, तर उद्या आपले परीक्षेत कसे होणार, अशी चिंता विद्यार्थ्यांना वाटू लागते. अशा वेळेस स्मरणशक्तीचा विशेष दोष नसतो. हा दोष मनाच्या चंचलतेमुळे व परीक्षेच्या भीतीमुळे निर्माण झालेला असतो.

२) दीर्घ स्मरणशक्ती : भूतकाळातील प्रसंग आठवणे, सामान्य ज्ञान, व्याकरणाचे ज्ञान हे या प्रकारात मोडते. स्मरणशक्तीत दोष निर्माण झाला, तर बहुधा तो र्‍हस्व स्मरणशक्तीत निर्माण होतो. परंतु, विद्यार्थ्यांनी त्याची काळजी करू नये. कारण, हे दोष मुख्यतः म्हातारपणी निर्माण होतात.

शालेय वयात स्मरणशक्तीस विशेष महत्त्व प्राप्त झालेले असते. वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करणे, तो समजून घेणे व परीक्षेच्या वेळेस ही सर्व माहिती व्यवस्थित व मुद्देसुदपणे उद्धृत करणे यावर विद्यार्थ्यांचे परीक्षेतील यश अवलंबून असते. स्मरणशक्ती जोखण्यासाठी बुद्ध्यांक वा (आयक्यू) चा उपयोग अल्प प्रमाणात होतो. या चाचण्या खास करून मतिमंद मुलांसाठी अंमलात आणल्या जातात. स्मरणशक्तीच्या कार्याची तुलना संगणकाच्या कार्याशी करता येईल. संगणकाच्या कार्याचेदेखील तीन मुख्य भाग आहेत - १) स्क्रिनवर विषयाची नीट मांडणी करणे २) ही माहिती विशिष्ट बटण दाबून व्यवस्थित मेमरीमध्ये जपून ठेवणे. ३) जरूर पडल्यास ती माहिती पुन्हा उद्धृत करणे. स्मरणशक्तीचे कार्यदेखील जवळ जवळ त्याच पद्धतीने चालते.

वर्गात सर शिकवित असताना आपण ती माहिती ज्ञानेंद्रियामार्फत गोळा करत असतो. वर्गात आपले लक्ष नीट नसल्यास व्यवस्थित माहिती गोळा होणार नाही व तिची साठवणूक पण व्यवस्थित होणार नाही. काही वेळाने सरांनी तीच माहिती विचारल्यास आपण उत्तर देऊ शकत नाही. कारण, ही माहिती गोळा होत असताना आपले लक्ष वर्गाच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांकडे होते. मनाची किंवा चित्ताची एकाग्रता स्मरणशक्तीसाठी अतिशय महत्त्वाची आहे. वर्गात शिकवत असताना किंवा घरी अभ्यास करताना मनाची एकाग्रता व्यवस्थित असल्यास परीक्षेच्या वेळेस व्यवस्थित आठवले नाही, असे सहसा होणार नाही. बर्‍याच पालकांची किंवा मुलांची परीक्षेच्या आधी स्मरणशक्तीबद्दलची तक्रार ही परीक्षेच्या भीतीमुळे मानसिक तणावामुळे निर्माण झालेली असते. मुळात अभ्यासच व्यवस्थित केला नसेल, तर फक्त स्मरणशक्तीलादोष देण्यात काही अर्थ नाही.

स्मरणशक्तीत दोष निर्माण होण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.


१) जन्मतः मतिमंद असणे : प्रसूतिपूर्व व प्रसूतीच्या वेळेस काही त्रास झाल्यास मूल पुढे मतिमंद होण्याची शक्यता असते.

२) कमी ऐकू येणे आणि दृष्टिदोष.

३) अभ्यासाचा अनावश्यक बोजा व चुकीची शिकवण्याची पद्धत.

४) शिकवित असताना किंवा अभ्यास करताना चित्ताची एकाग्रता नसणे.

५) कौटुंबिक कलह व मानसिक तणाव.

स्मरणशक्तीच्या कारणमीमांसेबद्दल आयुर्वेदात सुंदर विश्लेषण आढळते. आपण खाल्लेले अन्न व्यवस्थित पचण्यासाठी अग्नीची आवश्यकता असते. मिथ्या विचार व मिथ्या आहारामुळे अग्नी शरीरात व्यवस्थित उत्पन्न होत नाही. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन न होता त्याचे रुपांतर ’आम’मध्ये होते. या ’आम’चा शरीरातील वात, कफ व पित्त या त्रिदोषांशी संबंध येऊन समदोष निर्माण होतो व त्यामुळे स्मरणशक्तीत बिघाड होण्याची क्रिया सुरू होते. वात, कफ व पित्त या त्रिदोषामधील समतोल ढासळतो. विकृत ‘आम’मुळे मेंदूकडे आवश्यक तत्वे नेणार्‍या नलिका मनोवाह स्रोेत आकसल्या जातात व बंद होतात व स्मरणशक्तीतील दोष पुढीलक्रमाने निर्माण होतो.- प्रज्ञा- अपराध (मिथ्या आहार, मिथ्या विचार), अग्नीमाद्य, विकृत - आमनिर्मिती, मनोवाह स्रोतांचे आकुंचन पावणे व बंद होणे.

स्मरणशक्तीत दोष निर्माण होणे. आयुर्वेदाच्या दृष्टीने स्मरणशक्तीच्या दोषाकडे पाहिले असता सकस, नियमित आहार आणि विशुद्ध आचरण महत्त्वाचे आहे. बाजारात ‘तेजरस’, ‘शंखपुष्पी’, ‘कॉगनियम’, ‘मेमोरीन’ इत्यादी अनेक मेमरी टॉनिक्स उपलब्ध आहेत. त्याचा काही प्रमाणात उपयोग होऊ शकतो. परंतु, नियमित समतोल आहार आणि विशुद्ध आचरणदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

स्मरणशक्ती वाढविण्याचे काही उपाय


यातील सगळेच उपाय वाचकांना पटतील असे नाही. यातील काही उपायांबद्दल जरी गंभीरतेने विचार केला तरी परीक्षेत पुष्कळसा फायदा होऊ शकेल. आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना याचा खास करून उपयोग होऊ शकेल.अ‍ॅलोपथीमध्ये ‘एनसेफाबॉल’, ‘न्युरोसिटाम’ ही औषधे काही प्रमाणात स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात. परंतु, ही औषधे बरीच महाग आहेत व याचा उपयोग मुख्यत्वे करून मतिमंद मुलांसाठी केला जातो.आयुर्वेदामध्ये कुठलाही आजार किंवा व्याधी निर्माण होण्याच्या सहा अवस्था दिल्या आहेत. १) चय २) प्रकोप ३) प्रसार ४) स्थानसंश्रय ५) व्यक्ती ६) भेद.व्याधीसाठी उपाय लवकर सुरू केल्यास आजार पुढील अवस्थेत न जाता लवकर बरा होता.

व्याधी निवारणाचे किंवा उपचाराचे दोन प्रकार आहेत.


१) समशोधन : शरीराची शुद्धीक्रिया - पंचकर्माद्वारे शरीर शुद्ध केले जाते. नस्य, वमन, विरेचन या क्रिया जास्त लाभदायक ठरतात.

२) शमन : वात, कफ व पित्त याचे बिघडलेले संतुलन व्यवस्थित करण्यासाठी काही औषधे दिली जातात. याने मनोवाह स्तोत्र मोकळे होऊन मेंदूस आवश्यक तत्वांचा पुरवठा नियमित होऊ लागतो.

वरील सर्व तत्वांचा उपयोग केल्यास स्मरणशक्ती वाढविण्यास खालील उपचार केले जाऊ शकतात.
 
१) नियमित, समतोल आहार : असा आहार वर्षभर चालू ठेवावा. परंतु, खास करून परीक्षेच्या दिवसात यावर विशेष भर द्यावा. नेहमीच्या जेवणातील वरणभात, भाजी, पोळी, कोशिंबीर, चटणी, मेतकूट , दही किंवा ताक हे समतोल आहाराचे उत्तम उदाहरण आहे. जेवण मसालेदार व तिखट नसावे. दूध, फळे व पालेभाज्यांचा समावेश रोजच्या आहारात जरूर असावा. दुपारचे जेवण व्यवस्थित घ्यावे. परंतु, रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणापेक्षा कमी असावे. जेवणाच्या व न्याहरीच्या वेळादेखील नियमित असाव्या. बदाम, खजूर हे पदार्थ स्मरणशक्तीसाठी चांगले समजले जातात. त्याचा समावेश शक्य असल्यास रोजच्या आहारात करावा. परीक्षेच्या दिवसामध्ये अती कमी खाणे देखील त्रासदायक ठरू शकते.

२) नियमित दिनचर्या : सकाळी लवकर उठून सकाळचा काही वेळ देवपूजा, नामस्मरण, मनाचे श्लोक, शुद्धीक्रिया, योग, ब्रह्मविद्धा, आना-पान किंवा व्यायाम यासाठी राखून ठेवावा. आपण कुठल्याही धर्माचे असा वरील गोष्टींचा आत्मशुद्धीसाठी उपयोग होतो.

३) अनावश्यक जागरण टाळणे: यामुळे पुढच्या दिवसाची दिनचर्या विस्कळीत होते. रात्री ११ ते २ अभ्यास करण्यापेक्षा सकाळी लवकर उठून अभ्यास करावा. दिवसातील जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी उपयोगात आणावा. परीक्षेच्या काळात टीव्ही., व्हॉटस अ‍ॅप,मोबाईल पाहण्यात जास्त वेळ घालवू नये. याने आपला वेळ वाचेल व आत्मसंयमाचे समाधान लाभेल.परीक्षेच्या काळात लवकर झोपणे. झोप न लागल्यास काळजी करू नये, नियमित दीर्घ श्वास घेतल्यास काही वेळात झोप लागेल.

३) नियमित अभ्यास : अभ्यास हा फक्त गृहपाठ करण्यापुरता मर्यादित न राहता तो विषय समजावून घेण्यासाठी एकाग्र चित्ताने वाचन, मनन करावे. आपण वाचलेले लक्षात आहे की नाही हे बघण्यासाठी काही मुद्दे लिहून पाहावे. काही मुलांना लिखाणाचा कंटाळा असतो, पण त्यामुळे चांगला अभ्यास करून देखील परीक्षेत त्यांना चांगले यश मिळतनाही. परीक्षेच्या वेळेस अभ्यासाचे प्रमाण वाढविणे. कंटाळा आल्यास आकृत्या काढणे, लिहिणे, समीकरण लिहिणे इत्यादी प्रश्नांचा सराव करावा, गणिताचा सरावदेखील जास्तीत जास्त गणिते सोडवून करावा. फक्त गणिते वाचून स्मरणशक्तीवर अवलंबून राहू नका. परीक्षेच्या आदल्या दिवशी उजळणी स्वस्थ मनाने करावी. परीक्षेची कारण नसताना भीती वाटू देऊ नका.

४) गुरूजनांचा आदर : आपले प्रयत्न, गुरूजनाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद आपल्या उज्ज्वल यशासाठी आवश्यक आहे. बरेच विद्यार्थी क्लास व शिकवणीमध्ये व्यवस्थित लक्ष देतात. परंतु, शाळेत व्यवस्थित लक्ष देत नाहीत, तेथील वेळ ते सरांच्या चेष्टेत घालवितात. क्लासेसमध्ये चांगले शिकवतात अशी समजूत करून घेतात. शाळेतील सरांच्या शिकवण्यात काही दोष असतील परंतु त्यांच्या चांगल्या गुणांकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करू नये.

५) मिथ्या आचरणापासून स्वतःस दूर ठेवणे : स्मरणशक्ती व आचरणाचा संबंध काय असे विचारले जाऊ शकेल. आपले आचरण चांगले असेल, तर मनात अस्वस्थता कमी निर्माण होईल व अभ्यासात व्यवस्थित लक्ष लागेल. खोटे बोलणे, चोरी करणे व दुसर्‍यास इजा पोहोचवणे या तीन गोष्टींपासून विद्यार्थ्यांनी स्वतःस दूर ठेवावे. अनुकरणप्रियता हा विद्यार्थ्यांमधील आणखी एक गुण आहे. यासाठी पालकांनीदेखील आपले वागणे व्यवस्थित ठेवावे व घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे. टीव्ही सिनेमातील हिंसाचार, बिभत्सता, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपले आदर्श ठरविताना करू नये.

६) बाजारातील औषधे : वरील सर्व उपाय विद्यार्थ्यांना कटकटीचे वाटतील. आता वळू या स्मरणशक्ती वाढविणार्‍या औषधांकडे आयुर्वेदातील ब्राह्मी, जटामानसी, अश्वगंधा, शंखपुष्पी, टगर व ज्योतीस्मती ही औषधे स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात. बाजारात उपलब्ध असलेल्या बर्‍याचशा मेमरी टॉनिकमध्ये वरील घटक आढळतात. याशिवाय अन्नाचे व्यवस्थित पचन होण्यासाठी जायफळ, लवंग इत्यादी घटकदेखील या टॉनिकमध्ये असतात. सध्या बाजारात ‘तेजरस’, ‘मेमोरिन’, ‘कॉगनियम’ ही टॉनिक उपलब्ध आहेत. थोड्या फार फरकाने ही सर्व औषधे चांगली आहेत. नियमित घेतल्याने स्मरणशक्तीमध्ये चांगला फरक पडू शकतो. परंतु, फक्त औषधांवर अवलंबून न राहता इतर उपायांनाही तेवढेच महत्त्व द्यावे.आपणदेखील स्मरणशक्ती वाढविण्यासाठी वरील उपायांचा अवलंब करू शकता. मन लावून प्रयत्नपूर्वक वरील उपाय केल्यास आपल्याला निश्चितच भरघोस यश मिळेल.आपल्या परीक्षेसाठी सुयश चिंतीतो.

Popular posts from this blog

Vocation Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा 'हे' वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी!

श्श...! 'हे' Android ऍप गुपचूप चोरत आहेत तुमचा डेटा, लगेच करा डिलीट!!!!!!;

शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर!