शिवसृष्टी: एक प्रवास!
Sunday, February 19, 2023
शिवसृष्टी : एक प्रवास
छत्रपती शिवाजी महाराज’ हे नाव घेतल्याशिवाय हिंदुस्थानमध्ये सामर्थ्यनिर्मिती दुरापास्तच आहेत. छ. शि-वा-जी-म-हा-रा-ज या सात अक्षरात विलक्षण जादू आहे. जनतेच्या हृदयात शक्तीचा, सामर्थ्याचा, पराक्रमाचा, महत्त्वाकांक्षेचा, हिरिरीचा, कर्तृत्वाचा संचार करायचा असेल, तर त्यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा महामंत्र उच्चारावाच लागेल. विशाल राष्ट्रीय संघर्षासाठी चिवट, कणखर, ज्वलंत, रसरशीत राष्ट्रीय अस्मिता जागृत करायची असेल, तर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या महामंत्राचा जयघोष करावा लागेल. राष्ट्रव्यापी कर्तृत्व जागे करायचे असेल, तर राष्ट्रीय महापुरुषांच्या पराक्रमी वीरगाथेपासून प्रेरणा घेतली पाहिजे. राष्ट्रीय प्रेरणा आणि अस्मिता समानच असली पाहिजे. या समान राष्ट्रीय प्रेरणेशिवाय राष्ट्रीय चारित्र्याची जडणघडण अवघडच आहे.
‘पद्मविभूषण’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म पुरंदरे घराण्यात झाला. बाबासाहेबांचे वडील इतिहासाचे शिक्षक व घराणे ऐतिहासिक, त्यामुळे बालवयातच त्यांच्यावर इतिहासाचे व शिवचरित्राचे संस्कार झाले. कालानुसार पुढे ते वयोमानपरत्वे वृद्धिंगत होऊन त्याचे इतिहासाच्या वेडात रुपांतर झाले. इतिहासाचा संस्कार त्यांच्यावर उपजत ऐतिहासिक घराण्यामुळे झाला. त्याचप्रमाणे आणखी एका संस्काराची भर त्यात पडली व दोन्ही संस्काराच्या संयुक्त वेडाने त्यांना राष्ट्राच्या पुनरुत्थानाने झपाटले.
पुण्यात बाबासाहेबांचे वास्तव्य शुक्रवारपेठेतील शिर्के यांच्या वाड्यात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 ला नागपूर येथे झाली. 1931-32 मध्ये पुण्यात काही भागात संघाच्या शाखा निर्माण झाल्या. बालवयातच म्हणजेच बाबासाहेब आठ-दहा वर्षांचे असताना, संघ संस्काराचा पहिला संस्कार पुरंदरे कॉलनीतील संघ शाखेवर झाला. तो राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा होता. याच संस्काराने त्यांच्या ऐतिहासिक वेदाचे रुपांतर शिवचरित्राच्या माध्यमातून राष्ट्राच्या पुनरुत्थानात झाले.
बाबासाहेब म्हणतात, “वेड लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही. राष्ट्राचे पुनरुत्थान करायचे असेल, तर त्याचंच वेड लागावं लागतं.”
बाबासाहेबांनी ध्यास घेतला राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा! छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या माध्यमातून ‘राष्ट्राचे पुनरुत्थान’ हाच त्यांचा ध्यास होता. हाच त्यांचा श्वास होता. माध्यम ‘शिवचरित्र.’ शिवचरित्राच्या माध्यमातून बाबासाहेब शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रीय जीवनच जगले. याच श्वासाचा ध्यास जगातील जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयास म्हणजे शिवसृष्टी!
शिवसृष्टीच्या पूर्ततेसाठी बाबासाहेबांनी केले युरोप पर्यटन
शिवशाहीर बाबासाहेबांचं हे युरोप पर्यटन दि. 14 जुलै, 1978 ते दि. 14 ऑक्टोबर, 1978 या कालखंडात संपन्न झाले. जर्मनी, फ्रान्स, लंडन, इटली, रोम या देशातून हे पर्यटन झाले. या पर्यटनाचे आयोजन केले होते ‘अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान’ व ‘कौशिक आश्रम’ या न्यासाने. बाबासाहेबांनी या पर्यटनाचे प्रत्येक दिवसाचे सविस्तर वृत्त पत्राद्वारे प्रतिष्ठानला पाठवले. शेवटच्या पत्रात त्यांनी या पर्यटनाबाबत स्वतःचे मनोगत व्यक्त केले ते असे-
“द्वेष, शरणागती, लाचारी, अंधभक्ती, उपभोग, लालसा किंवा अंधानुकरण या सर्वांपासून आणि परधार्जिणेपणा, स्वत्वहीनता आणि गुलामगिरी या भावनांपासून अथवा राग अन् सूड यांपासून दूर राहून केवळ शिकायच्या आतुर भावनेने आणि रसिकतेने या जगाकडे (युरोपीय जगाकडे) पाहिले पाहिजे, तरच आपण काहीतरी नवीन निर्माण करू शकू.” याच पत्रात पुढे ते असे लिहितात की, “इतिहास हा विषय या यंत्रयुगात या युरोपियन गौरांगप्रभूंनी किती प्रकारांनी वस्त्रालंकारासारखा व ‘टॉनिक’सारखा आत्मसात केला आहे, हे पाहून मन थक्क होते. ही माणसं इतिहास अतिशय आधुनिक राहूनही जगतात. 300 वर्षे होऊन गेली तरी ऐतिहासिक व्यक्तिचरित्रे व घटना, संशोधक, विद्वान, कलावंत, तत्वज्ञ, समाजसेवक, साधू-संत आणि राष्ट्रभूमी याबद्दलचे नितांत प्रेम या लोकांच्या रक्तात भिनले आहे. त्याचे परिणाम दिसतात, पण प्रदर्शन अजिबातच दिसत नाहीये.
आपल्याकडे नेमके तेच घडावे. तो स्वभावच घडावा.” या संदर्भात बाबासाहेब पानशेत प्रलयाचे उदाहरण सांगतात. अनेक पक्षांनी आपापले झेंडे व फलक लावून मदत केंद्रे काढली. संघाने अपार मदत कार्य केले, पण झेंडे व फलक लावले नाही. तसे लावावेत म्हणजे संघाचे कार्य, कर्तव्य व त्याग लोकांच्या नजरेत भरेल,” असा अनेकांचा आग्रह (माझासुद्धा). सरसंघचालक गुरुजींनी साध्या पण स्पष्ट शब्दांत त्याला नकार दिला. ते म्हणाले, “समाजाला मदत करणारे तुम्ही समाजाहून वेगळे आहात काय? एकरूप व्हा. फलक लावू नका. समाजालाच स्वतःचे काम स्वतः संघटित, शिस्तबद्ध करीत राहण्याची सवय लावा. मी, या त्यांच्या शब्दांचा प्रयोगसिद्ध झालेला इतिहास आणि स्वभाव पाहिला. या देशात व इतर देशात प्रत्यक्षच!”
‘पद्मविभूषण’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपल्या भाद्रपद शु. 2 शिवशके 305 सोमवार ‘लंडन नगरी’ या पत्रात लिहितात, “राष्ट्रीय जीवन कसे असावे, याविषयी आपण संघात जे सांगतो, अगदी तसेच जीवन ही युरोपीय माणसे रोज जगत असतात, राष्ट्राचा जयजयकार आणि घोषणांचा घोष न कर्ता ही माणसे खरे राष्ट्रीय जीवन जगत असतात.”
बाबासाहेब लंडन भाद्रपद कृ. 11 या पत्रात बाबासाहेब ’र्चेीीशीींरि’ सतत 26 वर्षे एकाच ठिकाणी चालणारे नाटक पाहून म्हणतात, “मला असे वाटते की खास आपली म्हणून नाट्यसृष्टी असावी. अभिनय, संगीत, कथानक, संवाद, व्यक्तिरेखा, नेपथ्य खास आपल्या भारतीय हिंदू, मराठी संस्कृतीचे असावे अन् ते अत्यंत प्रभावी असावे. आपल्या (भारतीय हिंदू-मराठी) जीवनातील अंगोपांगावर आपल्याच संस्कृतीची दाट छाया असावी. घरे, बागा, कारंजी, पुतळे, शिक्षण, शिक्षणपद्धती, कपडे, लग्न समारंभ, सभा, चित्रपट, सत्कार समारंभ आणि सर्वच बाबतीत आपली सत्व आणि प्रतिभा असली पाहिजे.”
याच पत्रात बाबासाहेब असे लिहितात की, “युरोपमधील प्रत्येक व्यक्ती ही राष्ट्रसमर्पक जीवन जगते. आपण का नाही जगू शकत? ते आपल्याला करायचे. आपण ते करू शकू. हा आत्मविश्वास त्यांनी (बाबासाहेबांनी) युरोप पर्यटनातूनच आत्मसात केला. आपण निर्माण करत असलेल्या शिवसृष्टीची भूमिका व संकल्पना हीच आहे.”
‘पद्मविभूषण’ शिवशाहीर बाबासाहेबांचे अंतिम स्वप्न शिवसृष्टी. या शिवसृष्टीतील एका भागाचा उद्घाटन सोहळा दि. 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. ‘पद्मविभूषण’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अंतिम स्वप्नाची ही सांगता आहे. काय हवे आणखी कृतार्थ जीवनाची सांगता...
स्वप्नी जे देखिले ते ते तैसेची होतसे,
कळेना कायरे होते आनंदवनभुवनी॥
दिवाकर पांडे
(लेखक ‘जाणता राजा’चे प्रथम दिग्दर्शक आहेत.)
आता Dainik Digital च्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा.