हिमालयातील सोने...

Tuesday, February 14, 2023

हिमालयातील सोने...

    13-Feb-2023 
Lithium deposits found in J&K



जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा मोठा साठा सापडल्याची बातमी झळकल्यानंतर, हिमालयाच्या कुशीत जणू सोन्याची खाण सापडावी, असा हर्षोल्लास झाला. खरंतर अशा या सोन्याहूनही मौल्यवान लिथियममुळे काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या ‘ई-क्रांती’ला एक ‘बूस्टर’ मिळणार आहे.

घराणेशाही, राजकीय साठमारी आणि स्वाहाकार बाजूला ठेवून देश आणि समाज म्हणून विचार करायला सुरुवात झाली की काय होऊ शकते, याचे जीवंत उदाहरण नुकतेच जम्मू-काश्मीरमध्ये सापडले आहे. कृषी, फलोद्याने, रोजगार, पायाभूत सुविधा अशा कितीतरी आघाड्यांवर केंद्र सरकारने योजनापूर्वक काम काश्मीरमध्ये सुरु केले.

‘कलम ३७०’ हटविल्यानंतर विकासाची जी दालने नव्याने उघडली आहेत, त्यात आता एका नव्या आयामाचा समावेश झाला आहे व ‘पायाभूत सुविधा’ या विषयात काम करीत असताना २०२०-२१ सालापासून जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमच्या शक्यता पडताळण्याची सुरूवात झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून आता ५.९ दशलक्ष टन लिथियम सापडले आहे. बोलिवियाकडे सध्याच्या तारखेला २१ दशलक्ष टन लिथियमचे साठे आहेत. अर्जेंटिनाकडे १७ दशलक्ष टन, ऑस्ट्रेलियाकडे ६.३ दशलक्ष टन, तर लिथियमच्या शोधात जगभर फिरत असलेल्या चीनकडे मात्र सर्वात कमी म्हणजेच ४.५ दशलक्ष टन इतकाच साठा आहे.

लिथियमचे महत्त्व काय आहे, याचे उत्तर आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगातच सापडते. मोबाईल फोन, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा, सोलार पॅनेल्स ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत लिथियम नावाचा हा धातू बहुतांश उपकरणांमध्ये वापरला जातो. म्हणजेच इंधन आणि ऊर्जास्रोतांप्रमाणेच लिथियमही आजच्या ‘आयटी’ युगात तितकेच महत्त्वाचे ठरावे. पूर्वी ज्याप्रमाणे आखाती देशांना तेलाने श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचविले, तीच क्षमता आज या लिथियममध्ये आहे. म्हणूनच लिथियमला माहिती-तंत्रज्ञान युगातील आधुनिक इंधन म्हटले, तर कदापि वावगे ठरू नये. तेव्हा, जम्मू-काश्मीरमधील लिथियमच्या या साठ्याचा शोध सर्वार्थाने भारताच्या ‘डिजिटल’ क्रांतीला गतिमान करणारा ठरू शकतो, हे नि:संशय!
 
एखाद्या धातूची खाण सापडली, तर त्याचे कौतुक ते काय, असे प्रथमदर्शनी कदाचित वाटणे साहजिकच. पण, आज या लिथियमला त्याच्या उपयुक्ततेमुळे जागतिक बाजारपेठेत सोने आणि तेलाहूनही अधिक महत्त्व प्राप्त झालेले दिसते. म्हणूनच लिथियम इतर धातूंच्या तुलनेत भाव खाऊन जातो. जम्मू-काश्मीरमध्ये सापडलेला हा लिथियमचा साठा भारतातील अशाप्रकारचा पहिला आणि एकमेव साठा. याचाच अर्थ, स्वातंत्र्योत्तर काळापासून लिथियमचा एक साधा तुकडाही आपल्या खाणींत सापडला नव्हता आणि आज काश्मीरमधील या साठ्याच्या रुपाने उच्चप्रतीचा लिथियम साठा भूगर्भात गवसला आहे.

‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ (जीएसआय)च्या टीमने जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सलाल गावाजवळ ही लिथियमची खाण शोधून काढली. त्यामुळे साहजिकच सलाल आणि आसपासचे गावकरीही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यामुळे आनंदात आहेत. जम्मू-काश्मीर सरकारच्या धोरणाप्रमाणे खाणकामात कौशल्य असलेल्या अथवा नसलेल्या स्थानिकांनाही रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध होतील. त्यामुळे याच भागातील माता वैष्णोदेवीचे मंदिर, त्यामुळे निर्माण झालेल्या पर्यटनाच्या संधी, सलाल हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प, चिनाब नदीवरील रेल्वेचा जगातील सर्वात उंचावरील पूल आणि आता या लिथियमच्या खाणीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आसपासच्या गावांचीही अशा प्रकल्पांमुळे निश्चितच भरभराट होईल. तसेच, एरवी खाणकाम अथवा विकास प्रकल्प म्हटले की, प्रकल्पबाधितांना पुनर्वसन, जमिनीचा मोबदला, पर्यावरणाचा र्‍हास यांसारख्या मुद्द्यांवरुन रान पेटवले जाते.
 

पण, या बाबतीत तसे होऊ नये म्हणून पूर्ण खबरदारी घेत, स्थानिकांना योग्य मोबदला आणि पुनर्वसन याचेही आश्वासन सरकारने दिले आहे. त्यामुळे आगामी काळात येथील लिथियम उत्खननाचे काम सुरू होईलच. शिवाय जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा साठा सापडल्यामुळे, लिथियमशी संबंधित इलेक्ट्रॉनिक उद्योगांचीही आता या भारताच्या नंदनवनालाच पसंती असेल, जेणेकरून मालवाहतुकीचा खर्चही कमी होईल आणि काश्मीरच्या विकासाला सर्वार्थाने चार चाँद लागतील.


‘क्रिटिकल मिनरल्स’ या धातूवर्गात गणल्या जाणार्‍या लिथियमची महती वर्णावी तेवढी कमीच. परंतु, आज जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमच्या शोधाने एक वेगळीच ऊर्जा संचारली असली तरी हाच जल्लोष कदाचित २६ वर्षांपूर्वीही साजरा करता आला असता. कारण, ठीक २६ वर्षांपूर्वी, १९९५-९७च्या सुमारास ‘जीएसआय’ने संभाव्य लिथियमच्या साठ्याची शक्यताही तत्कालीन सरकारकडे व्यक्त केली होती. परंतु, त्याकडे फारसे गांभीर्याने न पाहता ‘जीएसआय’चा उत्खननाचा प्रस्ताव थंड बस्त्यात पडला तो कायमचाच. राजकीय दूरदृष्टीचा अभाव आणि काश्मीरमधील घराणेशाही, सरकारी भ्रष्टाचार यामुळे बर्फाखालील लिथियम असेच गोठून राहिले. पण, ‘कलम ३७०’ हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या सर्वांगीण विकासाचा विडा मोदी सरकारने उचलला. परिणामी, ‘जीएसआय’चे लिथियमच्या शोधार्थ अभियान मागील दोन वर्षांपासून पद्धतशीरपणे राबविले गेले आणि आज त्या अभियानाची फलप्राप्ती झालेली दिसते.

असे हे लिथियम सर्वार्थाने जम्मू-काश्मीरसह भारताची ‘डिजिटल’ भाग्यरेषा बदलणारे ठरु शकते, यात तीळमात्र शंका नसावी. कारण, आजतागायत आपण लिथियमसाठी १०० टक्के इतर देशांवर अवलंबून होतो. खासकरुन द. अमेरिकेतील देश, जिथे जगभरातील ५० टक्क्यांहून अधिक लिथियमचे साठे आढळतात. परंतु, आज काश्मीरमध्ये सापडलेला हा लिथियमचा साठा हा जगातील सातवा मोठा साठा ठरू शकतो. त्यामुळे भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्राचा ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांतर्गतचा विकास वेगवान होणार असून, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची स्वदेशी निर्मितीचीही गणिते बदलतील. या उपकरणांच्या किमती कमी होऊन सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. विदेशी अवलंबित्व कमी झाल्याने आयातही कमी होऊन परकीय गंगाजळीचीही बचत होईल. शिवाय भारत आपल्या गरजा पूर्ण करुन, लिथियमची भविष्यात निर्यातही करू शकतो. तेव्हा, अशा या हिमालयातील सोने ठरलेल्या लिथियममुळे केवळ काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण भारतात ई-क्रांतीची लाट पाहायला मिळेल, तो दिवस दूर नाही!


आता Dainik Digital च्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा,  चॅनलला सबस्क्राईब करा. 


Popular posts from this blog

Vocation Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा 'हे' वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी!

श्श...! 'हे' Android ऍप गुपचूप चोरत आहेत तुमचा डेटा, लगेच करा डिलीट!!!!!!;

शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर!