विद्यार्थ्यांना सांगीतिक ‘आकार’ देणारी शिक्षिका


विद्यार्थ्यांना सांगीतिक ‘आकार’ देणारी शिक्षिका

    10-Nov-2022 
 
चित्रा देशपांडे
 
 
 
 
शालेय जीवनात संगीताची गोडी विद्यार्थ्यांना लागावी, यासाठी चित्रा देशपांडे पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये गेल्या आठ वर्षांपासून ‘आकार’च्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी...
 
 
 
पुण्यात एका मोठ्या शैक्षणिक संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर आपल्या कलेचा, अनुभवाचा फायदा व्हावा, यासाठी चित्रा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना ’आकार’ देण्याचा उपक्रम सुरू केला. गेल्या आठ वर्षांपासून त्या पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहेत. संगीत शिक्षकाला उच्चपद किंवा बढती यासाठी फारसा वाव नसतो. पण, काहीतरी भरीव कामगिरी आपल्या हातून व्हावी, अशी इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला. परिणामी, आज त्यांच्या हाताखाली प्रशिक्षित झालेल्यांनी देशविदेशात पुण्याचा झेंडा रोवला आहे.
 
 
चित्रा देशपांडे स्वतः संगीत विशारद असून, संगीत शिक्षिका म्हणून प्रदीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमात सुखदा खांडकेकर या नृत्यांगनाही त्यांना मदत करतात. मराठी आणि हिंदी रंगभूमी, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून त्या सुप्रसिद्ध आहेत. ‘आकार’चे विश्वस्त प्रसिद्ध निवेदक अभिजित खांडकेकर यांचेही वेळोवळी मार्गदर्शन मिळत असल्याचे त्या आवर्जून सांगतात.
 
 
चित्रा देशपांडे सांगतात की, “पं. विजयागौरी बोकील यांच्याकडून संगीताचे धडे गिरवित मी पुण्यातील सिम्बॉयोसिस महाविद्यालयात रुजू झाले. तेथून संगीत शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यानंतर आपल्या संगीतातील अनुभवाचा फायदा शालेय विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी अनेक कल्पना आणल्या. पुढे काही जणांनी मदत घेतली आणि ‘आकार’चा जन्म झाला.”
 
 
विविध स्पर्धेच्या नावाखाली मुलांची होणारी फरफट, समाजावर होणारे दीर्घकालीन परिणाम याचे भान आजकालचे पालक विसरले असल्याचे लक्षात आले. या मुलांचे बालपण असेच हरवून बसल्याने अखेर त्यांना ‘आकार’मध्ये आणले. तेथून सुरुवात झाली ‘आकार’ संस्थेच्या कामाची. 10 ते 17 वयोगटातील मुलांना अर्थात ज्यांना संगीताची पार्श्वभूमी आहे, अशा वेगवेगळ्या शाळांतून परीक्षक बोलवून त्यांची निवड केली. संस्थेचा त्यांना कितपत फायदा होईल व त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास कसा होईल, यावर भर देण्यात आला. शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे संगीत शिकावे व त्याचे कसे आकलन करावे, याची सोपी भाषा शिकवली जाते.
सुरुवातीला ‘आकार’शी दहा विद्यार्थी जोडले. त्यानंतर हळूहळू या संस्थेची शिकविण्याची पद्धत यामुळे विद्यार्थी जोडत गेले. आतापर्यंत जवळपास 400 ते 500 विद्यार्थी हे संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. शालेय जीवनात कोणत्या विद्यार्थ्यांना संगीतनाट्यसाठी आग्रह धरला जातो. मात्र, तो काय शिकतो, यावर लक्ष कोणाचेच नसते. नेमका कसा अभ्यास करावा, हे आजही अनेकांना माहिती नाही. मुळात गाणे शिकताना नकळत मराठी भाषा सुधारली जाते. ती आणखी वाचली जाते, अशा वेगळ्या पद्धतीने ते शिक्षण मुलांच्या चांगले लक्षात राहते.
 
 
साहित्य संस्कृतीशी निगडित विषय घेऊन मुलांमध्ये संस्कार संवर्धनाचे काम ‘आकार’ करते. विशेष म्हणजे, प्रत्येक कार्यक्रमांमध्ये गायन, वादन, निवेदन ही मुलेच सादर करतात. संपूर्ण कार्यक्रम हे कलाकारच चालवतात. 10 ते 19 वयोगटातील बालकलाकारांनी संगीताच्या माध्यमातून विविध संकल्पना घेऊन देश आणि विदेशातील कार्यक्रमात वाहवा मिळवली.
आधुनिक वाल्मिकी महाकवी ग. दि. माडगूळकर रचित गीतरामायणातील निवडक गाण्यांचे सादरीकरण, बालगीतरामायण, अभंगरंग संतसाहित्यामधील अभंग, स्वा. सावरकर गीते तसेच सुरोत्सव-गोडवा मराठी संस्कृतीचा, ’कृष्णरंग’ अर्थात श्रीकृष्णाची गाणी अशा संहितांची निवड ‘आकार’ने केली. बालगीतरामायणाबरोबरच इतर संकल्पना घेऊन सादर केलेले ’आकार’चे विविध कार्यक्रम देश आणि विदेशात प्रतिष्ठित मंचांवरुन सादर झाल्याची आठवण आजही ताजी आहे. विद्यार्थ्यांना या माध्यमातून आपल्या इतिहासाची, भारतीय संस्कृतीची माहिती व्हावी, या उद्देशाने याचा समावेश करण्यात आला आहे.
 
 
‘आकार’चे विदेशामध्येही कार्यक्रम सादर केले आहेत. चौथे मराठी विश्व साहित्य संमेलन, थायलंड (बँकॉक) आणि स्वा. सावरकर पुण्यतिथी अंदमान, आठवे मराठी विश्व साहित्य संमेलन, दुबई तसेच, श्रीलंका येथे ‘रामायण महोत्सवां’तर्गत मुलांनी अभिवादन भारतीय स्वातंत्र्याला हा राष्ट्रभक्तीवर आधारित गीतांचा कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
 
 
जसे इतर विषयांचा अभ्यास करताना वाचन हे अत्यावश्यक आहे, त्याचप्रमाणे संगीतशास्त्रामध्ये गाणंसुद्धा वाचावं लागतं. गाणं वाचलं की, त्या शब्दांशी नातं जुळतं. अर्थ मनात उतरायला लागतो. या उद्देशांनी मुलांना वाचनाची आवड निर्माण केली. पुढे जाऊन अभंग, गीतरामायण, सावरकारांच्या कविता, मराठी महिने आणि सण, देशभक्ती अशा विविध विषयांची देशपांडे यांनी निवड केली. पुढे या विद्यार्थ्यांना राग, सूर, ताल कसे पोषक आहेत व शब्द, संगीत यांचे सौंदर्य खुलून आले आहे, याचे बारकावे आकारमधून उलगडले जातात.
 
 
तेव्हा, अशा या विद्यार्थ्यांना सांगीतिक आकार देणार्‍या चित्रा देशपांडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
 
 
 
- पंकज खोले
 
 
 

Popular posts from this blog

Vocation Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा 'हे' वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी!

श्श...! 'हे' Android ऍप गुपचूप चोरत आहेत तुमचा डेटा, लगेच करा डिलीट!!!!!!;

शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर!