जारकीहोळीचा हिंदूद्वेषी शिमगा!
Saturday, November 12, 2022
जारकीहोळीचा हिंदूद्वेषी शिमगा

एकीकडे काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रातून मार्गक्रमण असताना, याच पक्षाचा कर्नाटकमधील एक तिनपाट नेता सतीश जारकीहोळीने हिंदू धर्म आणि छत्रपती शिवरायांविषयी अत्यंत संतापजनक विधाने केली. हिंदुत्ववाद्यांच्या आंदोलनानंतर आणि दणक्यानंतर हिंदूद्वेषी शिमगा करणार्या जारकीहोळीने माफी मागितली असली तरी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हेच खरे!
हिंदू धर्म, चालीरीती, परंपरा याविषयी काडीमात्र अभ्यास नसलेल्यांनी, कोट्यवधी हिंदूंच्या भावना पायदळी तुडवत त्यांच्यावर उठसूठ तोंडसुख घेण्याची काँग्रेसची तशी जुनीच खोड! काँग्रेसच्या शासनकाळात तर हिंदूद्वेष्टे, तथ्यहीन दावे आणि सिद्धांतांचे पीक चांगलेच फोफावले आणि ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तर त्यांची मजल थेट ‘भगवा दहशतवाद’, ‘हिंदू दहशतवाद’ यांसारखे कुभांड रचण्यापर्यंत गेली. 2014 पासून मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देशभरात हिंदू पुनर्जागरणाच्या एका अभूतपूर्व प्रक्रियेचा प्रारंभ झाला.
हिंदू बांधव सर्वार्थाने ‘देव-देश-धर्म’ याप्रती जागरुक आणि जागृतही झाले. त्यामुळे हिंदूद्वेष्टी विधाने करून नंतर सारवासारव आणि माफीचे सोंग घेणार्यांनाही कायद्याच्या शिक्षेचा जोरदार दणका बसला. पण, तरीही हिंदूंना डिवचण्याची, अपमानित करण्याची काहींची जुनी खोड अजूनही काही केल्या जात नाही, हेच खरे! काँग्रेसचा कर्नाटकमधील आमदार सतीश जारकीहोळी हा असाच एक हिंदूद्वेष्टा दिवटा. हिंदू धर्माविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपण अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बरळून सहज सुटू, अशा अर्विभावात जारकीहोळीने हिंदूंविरोधी बोंबा ठोकल्या. पण, केवळ कर्नाटक नव्हे, तर देशाच्या कानाकोपर्यातून जारकीहोळीच्या पुतळ्यांचीच होळी पेटवल्यावर हा काँग्रेसी माफीवीर गयावया करू लागला. त्यामुळे जारकीहोळीसारख्या हिंदूद्वेष्ट्यांच्या विधानाला केवळ तेवढ्यापुरताच विरोध न करता, न्यायालयीन लढाईतून अशा वाचाळांना शिक्षा देऊन राजकीय मैदानातही लोळवण्याचीच नितांत गरज आहे.
सतीश जारकीहोळी हा कर्नाटक सरकारमध्ये पूर्वी मंत्री वगैरे राहिलेला आमदार. महाराष्ट्रद्वेषाबरोबरच स्वत: हिंदू असूनही हिंदूद्वेष मात्र नसानसांत अगदी ठासून भरलेला. एका कार्यक्रमात बोलताना या महाशयांना “ ‘हिंदू’ शब्दच हा मुळी बाहेरचा आहे. हा शब्द फारसी असून त्याचा अर्थ ‘अत्यंत घाणेरडा’ होता. हा शब्द आपल्यावर लादला गेला. त्याचा खरा अर्थ तुम्हाला कळला तर तुम्हालाही लाज वाटेल,” असा तर्कहीन दावा करण्याची दुर्बुद्धी सुचली. एवढ्यावरही थांबेल तो जारकीहोळी कसला! ‘माझे विधान असत्य सिद्ध झाले तर राजीनामा देईन,’ अशी पुष्टीही या महाशयांनी जोडली. जारकीहोळीच्या या फुकाच्या आत्मविश्वासावर आता काय म्हणावे... असा दावा करणार्या जारकीहोळीकडे त्याने केलेली विधाने सिद्ध करण्यासाठी पुरावा काय, असा प्रश्न साहजिकच. कुठले संशोधन पत्र आहे की भाषासंबंधी एखादा अभ्यास वगैरे. पण, समर्थ रामदासांच्या भाषेत जारकीहोळी ठरला तो ‘पढतमूर्ख’च! म्हणे, काही पुस्तके वाचून आणि विकीपीडियावरील माहितीवरून त्याने असे बेछूट विधान केले. मग नेमके कोणते असे पुस्तक वाचले, असे विचारल्यानंतर तर जारकीहोळीची बोबडीच वळली.
त्या पुस्तकाचे चक्क नावच आठवत नाही, म्हणून या खोटारड्याने स्वत:चे अधिकचे हसे करून घेतले. त्यामुळे कोणतीही ठोस माहिती, पुरावे नसताना, ज्या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, त्याच देशात उभे राहून हिंदूंविरोधी अशी बाष्कळ विधाने करताना जारकीहोळीला किंचितही लाज-शरम वाटली नाहीच. निवडणुकीत या असल्या विधानामुळे हिंदूंची मते मिळणार नाहीत, असे पक्षाने दटावल्यानंतर मग दिखाव्यासाठी जारकीहोळीने माफीनामाही सादर केला. त्यातच जारकीहोळी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेही कर्नाटकचे काँग्रेसबंधू. मग खर्गेंनी तर जारकीहोळीच्या कानाखाली अशा वादग्रस्त विधानांबद्दल जाळ काढायला हवा होता. पण, मुळातच हिंदूद्वेष काँग्रेसच्या ‘डीएनए’मध्येच आटोकाट भिनलेला असल्यामुळे खर्गे असो वा गांधी, अशा हिंदूद्वेष्ट्यांना पाठीशी घालण्याचेच उद्योग ही मंडळी करणार, हे नि:संशय!
खरंतर जारकीहोळीने ‘हिंदू’ शब्दाविषयी, धर्माविषयी केलेले हे असले असत्य दावे, यापूर्वीही किती फसवे, फोल आणि हिंदूविरोधी षड्यंत्राचा भाग आहेत, हे वारंवार सिद्ध झाले आहे. पाश्चात्त्य अभ्यासकांच्या मते, पर्शियन मंडळींना ‘एस’ उच्चारता येत नाही, म्हणून ‘एस’चा अपभ्रंश ‘एच’ होऊन ‘सिंधू’चा ‘हिंदू’ शब्द झाला, यालाही कित्येक भारतीय संशोधकांनी पुराव्यांनिशी खोडून काढले आहे. कारण, ख्रिश्चन, मुसलमानांपूर्वीपासून हजारो वर्षे हिंदू संस्कृती, सभ्यता ही अस्तित्वात आहे. तसेच, या भूमीतील शिलालेख, धर्मग्रंथांमध्येही ‘हिंदू’ असा उल्लेख स्पष्टपणे असल्याचेही संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. यासंदर्भातच एक श्लोक ‘शब्दकलद्रुपम’ या संस्कृत महाशब्दकोशात सापडतो. या संपूर्ण शब्दकोशात पाणिनीच्या व्याकरणाच्या नियमांनुसार शब्दांची व्युत्तपत्ती नमूद केली आहे. त्यातील एक मंत्र म्हणजे - ‘हीनं दुष्यति इतिहिंदू जाती विशेष:’ अर्थात, हीन कामाचा त्याग करणार्याला ‘हिंदू’ म्हणतात. पण, पाश्चात्त्यांच्या कीडलेल्या बुद्धीला प्रमाण मानणार्या जारकीहोळीसारख्या नतद्रष्टांनी ‘घाणेरडे काम करणारा तो हिंदू’ असा अगदी विपरित अर्थ काढून हिंदू शब्दाचा, धर्माचा अपप्रचार करून बुद्धिभेद करण्याचेच उद्योग केले. त्यामुळे धर्म, इतिहास याच्याशी तीळमात्रही संबंध नसलेल्या जारकीहोळीने आपली अक्कल अशी पाजळल्यानंतर हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागणे स्वाभाविकच. पण, हा वाचाळवीर जारकीहोळी तेवढ्यावरही न थांबता हिंदू धर्मावरून थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावरही घसरला.
“ब्रिटिशांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. कारण, संभाजी राजेंनीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अन्नात विष कालवले होते. संभाजीराजेंच्या हत्येनंतर त्यांना ‘धर्मवीर’ ही पदवी देण्यात आली होती. संभाजीराजेंना ‘धर्मवीर’ पदवी देण्याचा इतिहासदेखील खूप वेगळा असून तो समजून घ्यायचा असेल, तर त्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल,” असे धादांत खोटे विधान करून जारकीहोळीने अकलेचे तारे तोडले. त्यामुळे एकीकडे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात असताना शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचा आमदार शिवरायांविषयी, संभाजी राजेंविषयी असली विखारी विधाने करून महाराष्ट्राच्या अस्मितेला अक्षरश: पायदळी तुडवतो. त्यामुळे काँग्रेसचे खायचे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत, हे या घटनेवरून पुनश्च सिद्ध होते.
त्यामुळे जारकीहोळीसारख्या हिंदूद्वेष्ट्यांना निवडणुकीच्या माध्यमातूनच राजकारणातून कायमस्वरुपी हद्दपार करण्याचा विडा आता कर्नाटकमधील हिंदू बांधवांनी उचलावा. कारण, जारकीहोळीसारखी माणसं ही असली विधाने केवळ हिंदू धर्माविषयीच बरळण्याची हिंमत करतात. कारण, हिंदू बांधव ‘सर तन से जुदा’च्या धमक्याही देत नाही की, प्रत्यक्ष जाऊन कोणाचा गळा कापणे तर सोडाच, गळा साधा पकडायलाही जात नाहीत. अशानेच जारकीहोळीसारख्या हिंदूद्वेष्ट्यांचे फावते आणि इतर धर्मांविषयी, त्यांच्या चालीरितींविषयी तोंडातून ब्र ही न काढता, ही मंडळी हिंदूनिंदेत अशी पुरोगामी धन्यता मानतात. तेव्हा, नुसते ‘हिंदू तन-मन मेरा जीवन’ हे विचार काव्यपंक्तींपुरतेच वैचारिक-बौद्धिक चौकटीत न ठेवता, हिंदू बांधवांनी सनदशीर आणि लोकशाहीमार्गाने जारकीहोळीसारख्या हिंदूनिंदकाला त्याची खरी जागा दाखवून, तो कधीही विसरणार नाही असा धडा आता शिकवावा!
बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा,