अग्रलेख


केजरीवालांचे बेगडी हिंदुत्व

   

अरविंद केजरीवाल 
 
 
 
 
 
केजरीवालांच्या राजकारणाला दिल्लीकर जनता बळी पडली आणि आताच्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात हिमाचली वा गुजराती जनताही बळी पडू शकते. पण, त्यांना वेळीच सावरण्याचे, अरविंद केजरीवालांची ढोंगबाजी सर्वांसमोर आणण्याची गरज आहे आणि ते काम भाजपसह हिंदूंनीही केलेच पाहिजे.
 
 
 
एरवी मुल्ला-मौलवींवर सरकारी तिजोरीतून खैरात करणार्‍या अरविंद केजरीवालांना हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू, हिंदुत्वाची आठवण झाल्याचे दिसते. नुकतीच त्यांनी, भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसह लक्ष्मी-गणेशाची प्रतिमा छापण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. त्यामागे देशाची ढासळती अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मदत होईल, लक्ष्मी-गणेशाचा आशीर्वाद मिळेल, असे कारणही त्यांनी दिले. खरे म्हणजे, लक्ष्मी-गणेश वा अन्य देवी-देवता, मंदिरे, सण-उत्सव हिंदूंच्या जिव्हाळ्याचा विषय. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात हिंदूंच्या राष्ट्रीय प्रतीकांचा, लक्ष्मी-गणेश वा अन्य देवी-देवतांचा, चलनी नोटांवर स्वातंत्र्यापासूनच समावेश करायला हवा होता. पण, तसे झाले नाही, त्याला कारण काँग्रेस व डाव्यांची हिंदूविरोधी हातमिळवणी. त्यातूनच हिंदू व हिंदुत्वाच्या खुणा-प्रतीकांना कमी लेखण्याचे उद्योग केले गेले. हिंदू समाजातल्यांनीच हिंदूंविरोधात उभे ठाकावे, हिंदू समाजातल्यांनाच आपल्या हिंदूपणाची लाज वाटावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले.
 
 
 
अर्थात, तसे असले तरी देशात दुसर्‍या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व अन्य संघटना आणि जनसंघ व नंतरच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हिंदू, हिंदुत्वाचा स्वाभिमान जागवण्याचे कार्य सुरूच होते. 2014 साली त्यातूनच हिंदुत्वाचे जाहीर प्रकटीकरण करणार्‍या नरेंद्र मोदींना भारतीय जनतेने पंतप्रधानपदी बसवले व 2019 सालीही आधीपेक्षा अधिक जागा दिल्या. तसेच, राज्याराज्यांतल्या विधानसभा निवडणुकांतही भाजपला दणदणीत यश मिळू लागले. ते पाहूनच राहुल गांधींपासून अरविंद केजरीवालांपर्यंतचे रंगबदलू सरडे कामाला लागले. राहुल गांधींना अचानक आपण दत्तात्रय गोत्री, जानवेधारी ब्राह्मण असल्याचा साक्षात्कार झाला आणि ते मठ-मंदिरांचे उंबरठे ते झिजवू लागले, तर आता अरविंद केजरीवालांना चलनी नोटांवर लक्ष्मी-गणेशाची प्रतिमा छापण्याची मागणी करावीशी वाटली. असे केले तर आपल्यामागे हिंदू मतदार उभे ठाकतील आणि येत्या विधानसभा निवडणुकांतील संभाव्य नुकसान टळून आपल्याला विजय मिळेल, अशी त्यांची अपेक्षा. पण, देशातल्या हिंदूंनी अरविंद केजरीवालांना पुरते ओळखले आहे. त्यांची स्वतःची आणि त्यांनी आपल्या भोवताली गोळा केलेल्यांची आतापर्यंतची कृत्ये टाहो फोडून आपला हिंदूद्रोह सांगत आहेत.
 
 
 
चालू महिन्यातच दिल्लीत केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील राजेंद्र पाल गौतम या मंत्र्याने हिंदूविरोधी कृत्य करत हजारोंचे धर्मांतर घडवून आणले. त्यावेळी त्यांनी हिंदू देवीदेवता, राम-कृष्णाविरोधात विखारी विधानेही केली. पण, निवडणूक काळात हिंदुत्व जागे झालेल्या अरविंद केजरीवालांनी हिंदूविरोधी कृत्य केल्यावरून राजेंद्र पाल गौतम यांना कडक शब्दांत सुनावले नाही वा त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली नाही. उलट, धर्मांतराच्या आणि हिंदू देवी-देवताविरोधी विधानाला मूक संमती असल्याचे दाखवत केजरीवाल मीठाची गुळणी धरून गप्प बसले. नंतर प्रकरण तापल्याने त्यांनी राजेंद्र पाल गौतम यांचा फक्त मंत्रिपदाचा राजीनामा घेतला पक्ष सदस्यत्वाचा नव्हे. म्हणूनच राजेंद्र पाल गौतम आजही आम आदमी पक्षाचे सदस्य आणि आमदारही आहेत. अरविंद केजरीवाल खरोखर हिंदुत्ववादी असते, त्यांना हिंदूंच्या भावनांची जाणीव असती तर त्यांनी राजेंद्र पाल गौतम यांना पक्षातूनही हाकलले असते. पण, तसे झाले नाही आणि म्हणूनच बेगडी हिंदुत्वाची झुल पांघरलेल्या केजरीवालांच्या राजेंद्र पाल गौतम यांना पक्षातच ठेवण्याच्या कृत्याकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही.
 
 
 
त्याच दरम्यान, आपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनीदेखील हिंदूविरोधी विधान केले. “मंदिरे आणि कथामंडप शोषणाचे अड्डे झाले असून महिलांनी तिथे जाऊ नये,” असे अतिशय विकृत विधान इटालिया यांनी केले. इथेच अरविंद केजरीवालांनी जमवलेल्या लोकांच्या मनात काठोकाठ भरलेला हिंदूद्वेष दिसून येते. अशाच आशयाचे विधान एकदा राहुल गांधींनीही केले होते, मंदिरात पूजा करणारेच मुलींना छेडतात, असे ते म्हणाले होते. तेव्हापासून राहुल गांधींचे राजकारणातील स्थान अप्रासंगिक होत गेले, तसे आता अरविंद केजरीवालांचेही होईल. कारण, मंदिरे, कथावाचन करणार्‍या साधू-संतांविरोधात अश्लाघ्य भाषा वापरूनही केजरीवालांनी गोपाल इटालियांवर काहीही कारवाई केली नाही, ते आजही ‘आप’चे गुजरात प्रदेशाध्यक्ष आहेतच. हेच का अरविंद केजरीवालांचे हिंदुत्व, हिंदूप्रेम?
 
 
 
केजरीवालांचे सहकारीच नव्हे, तर खुद्द अरविंद केजरीवालांनीदेखील आपल्या आजीचे नाव घेत अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी उभारल्या जात असलेल्या श्रीराम मंदिराला विरोध करत तिथे रुग्णालय बांधण्याची मागणी केली होती. तसेच, मी त्या मंदिरात कधीही पूजा करणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली होती. त्या केजरीवालांना आज अचानक हिंदुत्वाचा उमाळा कसा काय आला? इतकेच नव्हे, तर यंदाच्या दिवाळीआधी, फटाके वाजवणार्‍यांना तुरुंगात डांबेल अशी जाहीर धमकीही त्यांनी दिली होती. त्याआधी ‘आप’ नेत्यांनीच दिल्ली दंगलीत हिंदूंच्या नरसंहाराचे कटकारस्थान केले होते आणि त्या नेत्यांचा बचाव करताना अरविंद केजरीवालांची जिभ थांबत नव्हती. 
 
 
 
काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला खोटे पाडत भर विधानसभेत रावणासारखे हसण्याचे कामही त्यांनीच केले होते. म्हणजे, काँग्रेसने सातत्याने मुस्लिमांचे लांगूलचालन आणि हिंदूंच्या भावनांचा उपमर्द करत राजकारण केले. तसेच, राजकारण केजरीवालांनीही चालवलेले आहे. त्यांच्या या राजकारणाला दिल्लीकर जनता बळी पडली आणि आताच्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात हिमाचली वा गुजराती जनताही बळी पडू शकते. महाराष्ट्रात जसे शिवसेनेच्या मराठीच्या, हिंदुत्वाच्या मुद्द्याला मराठी माणूस बळी पडला, पण हाती काहीच लागले नाही, तसाच तो आपच्या कृत्यांनाही बळी पडण्याची शक्यता आहे. पण, त्यांना वेळीच सावरण्याचे, अरविंद केजरीवालांची ढोंगबाजी सर्वांसमोर आणण्याची गरज आहे आणि ते काम भाजपसह हिंदूंनीही केलेच पाहिजे.
 आपला वार्ताहर - महादेव इंगळे ( पुणे )
 

Popular posts from this blog

Vocation Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा 'हे' वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी!

श्श...! 'हे' Android ऍप गुपचूप चोरत आहेत तुमचा डेटा, लगेच करा डिलीट!!!!!!;

शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर!